राम आणी रावण.

राम आणि रावण...
 महाभारतीय युध्द इसवीपूर्व ९ व्या शतकात झाले, असा कालनिर्णय हस्तिनापूर, इंद्रप्रस्थ, इत्यादी ठिकाणी करण्यात आलेल्या उत्खननावरून व उत्खनितांच्या कार्बन डेटिंगवरून डी. डी. कोसंबींनी केलेला आहे. रामायण यापूर्वी एक शतक (इसवीपूर्व १० वे शतक) घडले, असा कालनिर्णय अयोध्या, इत्यादी केल्या गेलेल्या उत्खननांवरून व उत्खनितांच्या कार्बन डेटिंगवरून करण्यात आलेला आहे. मूळ व्यासकृत महाभारताची कथने-संस्करणे प्रथम सूतांकडून व नंतर भार्गवगोत्रीय ब्राह्मणांकडून होत त्याचा आजचा विस्तार झाल्यामुळे त्यावर मध्ययुगीनही पुटे चढलेली आहेत. वाल्मिकिकृत रामायणाचे तसेच झालेले आहे. रामायणाची कथा महाभारतकथा रामायणात सांगितली गेलेली नाही हा रामायण पूर्ववर्तित्वाचा पुरावा आहे. महाभारतही बुध्दपूर्व काळात घडले याचा पुरावा म्हणजे 'दसरथ जातक' होय. 

       रामायणात रामाने प्रथम ताटकेच्या व नंतर शूर्पणखेच्या स्रीराज्यांच्या उच्छेद केला आणि नंतर लंकेच्या 'मातृवंशक' राजक गणराज्याच्या पराभव. यावरूनही रामायण हे महाभारतपूर्व असल्याचे निर्णायकपणे सिध्द होते. रामायणतला वास्तविक सांस्कृतिसंघर्ष हा आहे. 

       इंद्रप्रस्थाच्या स्रीराज्याची राणी असलेली द्रौपदी, अर्जुनाने तिला सवत आणताच क्रुध्द झाली. त्याचप्रमाणे सीताहरणातून मंदोदरी क्रुध्द झाली. लंकेचे गणराज्य रावणाच्या आधिपत्यात दासप्रधाक झालेले होते आणि सीताहरणातून तो ते 'पुरुषसत्ताक' करू पहात होता. 

       राम व रावण यांच्यातील संघर्ष आर्य व अनार्य यांच्यातील नव्हता. कारण दोघेही काळे होते. त्यांच्यातील संघर्ष विषमता विरुध्द समता असाही नव्हता. कारण राम चातुर्वर्ण्य शुद्रप्रथाक गणराज्याचा वनवासी होता, तर रावण त्रैवर्ण्य दासप्रधाक गणराज्याचा पदाधिष्ठित राजर्षि होता. दोन गुलामगिरीप्रथाक शासक-शोषक सत्तांमधील हा संघर्ष होता. म्हणून, ब्राह्मणी प्रस्थापितांनी तेव्हापासून रामाची मिथ उभी केली, तर या शतकाच्या प्रारंभात अब्राह्मणी मध्यमजातीय प्रस्थापितांनी रावणाची. पण दलितांमध्ये रावणाची मिथ आता उभी करणे म्हणजे दलित प्रस्थापितांच्या हितसंबंधांंचे उदात्तीकरण करणे होय. 

       समाजक्रांती म्हणजे केवळ समतेची क्रांती नसते. समाजविकासाला अडथळा बनलेली उत्पादनसाधने व संबंध बदलून समाजविकास मोकळा करणारे कोणतेही सामाजिक परिवर्तन समाजक्रांती असते. "खुद्द जात्यन्ताच्या समाजक्रांतीतून सम्यक समता येणार नाही. जात्यन्तातून भांडवलदारी समता येईल हे जाणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जात्यन्त ही भारतीय लोकशाही क्रांतीची कामगिरी मानली होती." युरोपात वरकड उत्पादनपूर्व गणसमाजाचा अंत करून दासप्रथा आली. तीत माणसाला गुलाम केले, तरी मानवसमाजाने त्यातून पुढचे पाऊल टाकले. मानव हा प्रगतीचे अमृत नरकपालातून पीत आलेला आहे, असे मार्क्सने म्हटलेले आहे. दासप्रथेला आधुनिक नैतिकतेची कसोटी लावून ऐतिहासिक कालखंडाचे आकलन होणार नाही. दासप्रथा ही जर समाजक्रांती असेल, तर तिचे नेतृत्व करणारे क्रांतिकारकच ठरतील. 

       त्याचप्रमाणे भारतात चातुर्वर्ण्य व्यवस्थेने वरकड उत्पादनपूर्व समाज नष्ट करून उत्पादन समाज आणला असेल, तर तिला क्रांतिकारकच ठरतील लागेल. वि. का. राजवाडेंनी तिला याच कसोटीवर क्रांतिकारी ठरवले आहे. या समाजक्रांतीचे नेतृत्व रामाने केले, म्हणून भारतीय जनमानसात तो चिरस्थायी झालेला आहे. भारतीय जनता रामाला का पूज्य मानले हे तिला समाजक्रांतिकारकांनी समजावून सांगितले पाहिजे. समाजक्रांतिकारकांना तिथे भारतीय समजलेला नाही, तिथे 'तरीही राम पुजनीय कसा' हे तिला कसे समजेल...? महापुरुषांची जेव्हा एतिहासिकता समजते, तेव्हाच त्यांची मर्यादा समजते. पण त्यांची केवळ मर्यादाच सांगितली, तर त्यांची भक्ती बुध्दिप्रामाण्याकडे न जाता आणखी कर्मठतेकडे जाते.

       "दाक्षिण्यात्य ब्राह्मणेतरी चळवळीने ब्राह्मणी रामाच्या विरोधात अब्राह्मणी रावणाची जी मिथ उभी केली, ती मिथ उभी करणाऱ्या रामस्वामी पेरियारांच्या अनुयायांनी तामिळनाडूत भांडवलदारी-जमीनदारी ब्राह्मणी शासनाऐवजी भांडवलदारी-जमीनदारी अब्राह्मणी शासन स्थापलेले आहे...!

       आद्य पितृवंशक ऋत्विजगोत्रांत जन्मलेल्या विश्वामित्राने युवा रामाला अनार्य राक्षसांच्या संहाराचा वर्णाश्रम धर्मपालनाचा पहिला धडा देऊन मिथिलेकडे चालवले. रस्त्यात मलद-कुरुषांचे जनपद लागले. त्याची राणी होती 'ताटका'. ताटक म्हणजे कोहळा, ताटका वा ताडका म्हणजे ताडाच्या उपवनाची मातृदेवता का तिची अंबपली वा पुरारीण. "ताटका मलद-कुरुषांच्या स्री-राज्याची राणी होती".

         विश्वामित्र, राम व लक्ष्मण या अतिथींचे स्वागत करायला ती येऊ लावली. विश्वामित्राने रामाला सांगितले की, ती आपल्याला खायला येते आहे, मार तिला...! "स्रीहत्या हा अधर्म असल्याचे रामाच्या डोक्यात घोळत असल्याचे पाहून विश्वामित्राने त्याला 'चातुर्वर्ण्यरक्षणार्थ' स्रीवध करणे हा नवा धर्म कसा आहे याचा उपदेश केला". ताटकावधापासून रामाने स्री-राज्यउच्छेद सुरू केला, म्हणून त्याचे नाव 'पुरुषोत्तम' पडले.

        कोसल गणाचा एक जानपद वृध्द ब्राह्मण चौदा वर्षाच्या आपल्या लाडक्या एकुलत्या एक मुलाच्या प्रेताला कवटाळीत राजद्वारावर आक्रोश करतो आहे, रामाला व रामराज्याला शिव्याशाप देतो आहे आणि पुत्राला रामाने जिवंत न केल्यास तेथेच जीव देऊन ब्रह्महत्येचे पाप रामाच्या डोक्यावर मारायची धमकी देतो आहे. 'परमेश्वर' राम दुःखचिंतामग्न झालेला आहे ! 

        रामाने त्याच्या मांत्रिक ऋषीना या अकाली मृत्यूचे कारण विचारले. त्यांनी कारण जाणण्यासाठी ब्राह्मण पित्याला ना पुत्र मृत्यूचे कारण विचारले ना प्रेताचे पोस्टमॉर्टम केले. त्यांनी रामाला जे कारण सांगितले ते थोडक्यात असे- 

        "राजन ! कृतयुगात केवळ ब्राह्मणच तपश्चर्या करीत. त्रेतायुगात ब्राह्मणांबरोबर क्षत्रियही तपश्चर्या करायला लागले. सांप्रतच्या द्वापरयुगांत तर वैश्यही तपश्चर्या  करायला लागलेले आहेत. पण, शूद्रांनी तपश्चर्या करणे हा अधर्म आहे. तुझ्या राज्यात दुर्बुध्दी शूद्र महातपस्वी बनून तप करतो आहे आणि त्यामुळे हा ब्राह्मणवध झालेला आहे. या दुष्कृत्याचे निवारण कर ! मग, धर्म व द्विजवर्ण यांचा अभिवृध्दी होईल आणि हा ब्राह्मण बालक जीवंत होईल !" ( उत्तरकांड, सर्ग ७४)

       आदिवासींत पिकांवर वा जनावरांवर वा कुटुंबियांवर रोगराई वा इतर आपत्ती आली, की भगत 'गुढी काढून' डाकीण दाखवतो. आदिवासींत वर्णजातिव्यवस्था नसली, तरी पुरुषसत्ता असल्यामुळे 'दुष्कृत्याचे' खापर स्रीवर फोडले जाते. "रामाच्या वर्णव्यवस्थेत वसिष्ठादी महाब्राह्मण भगतांनी ते खापर 'महातपस्वी' शूद्रावर फोडले. रामाने ही गुढी शिरसावंद्य केली. 'त्रिकालज्ञ' रामाचे बुध्दीवैभव आदिवासींच्या चिफटेनपेक्षा जास्त नव्हते !

        रामाला कोसल जनपदाच्या पश्चिम, उत्तर व पूर्व दिशेला अधर्म दिसला नाही. तो दिसला केवळ दक्षिण दिशेला. दक्षिण दिशासुध्दा मृत्यूची. शूद्रांना धर्मशास्त्र श्मशान म्हणते. म्हणून ती शूद्रांची. त्या दिशेला शैवल पर्वतावरील एका सरोवराकाठी एक तापस स्वतःला झाडाला उलटे टांगून घेऊन घोर तपश्चर्या करीत असलेला रामाला दिसला.

        राम पुष्पकावरुन उतरून त्याच्या जवळ गेला आणि त्याने तापसाच्या तपश्चर्येची स्तुती करून त्याला त्याचा वर्ण विचारला. तापस उत्तरला की, सदेह मिळवण्यासाठी त्याने उग्र तप चालवले आहे आणि तो शूद्र असून त्याचे नाव शंबूक आहे. शंबूक म्हणजे आजचा दलित. ते ऐकताच रामाने पुढे काहीएक चौकशी न करता- कारण कायद्यापुढे सर्व समान असतात हे आधुनिक पाश्चिमात्य कायद्याचे तत्व परमेश्वर रामाला माहीत नव्हते- त्याने म्यानातून 'विमल' खड्ग उपसले आणि शंबूकाचे अधांतरी लटकणारे मस्तक धडावेगळे केले ! 

        ब्राह्मणपुत्र प्रत्यक्षात जिवंत झाला की नाही हे रामायण सांगत नाही. ज्या ब्राह्मण पितापुत्रांकरिता हे रामायण घडले, त्यांची नावे हा इतिजहासदेव सांगत नाही.

       मार्कण्डेय पुराण सांगते की, जो माणूस परतंत्र असतो, त्याच्यात मनुष्यता कितपत असू शकते? स्वातंत्र्य हे माणसाच्या जीवनाचा प्राण आहे. जे या लोकी स्वातंत्र्य गमावतात, ते परलोकीच्या स्वातंत्र्यासाठी आमरण धडपडतात. या परलौकिक स्वातंत्र्यालाच आपण मोक्ष म्हणतो. शूद्र शंबूक रामाला म्हणाला की, उच्चवर्णीयांप्रमाणे सदेह स्वर्गाला जावे म्हणून मी हे घोर तप करतो आहे. ज्या परतंत्राचे आध्यात्मिक स्वातंत्र्याने समाधान होत नाही, ते भौतिक स्वातंत्र्याकरता बंड करतात. परतंत्र आदिवासींचेही आध्यात्मिक स्वातंत्र्याने कधीच समाधान झालेले नाही, किंबहुना त्यांना ते कळलेच नाही.

        ब्राह्मणी प्रस्थापितांनी तेव्हापासून रामाची मिथ उभी केली, तर या शतकाच्या प्रारंभात अब्राह्मणी मध्यमजातीय प्रस्थापितांनी रावणाची. पण दलितांमध्ये रावणाची मिथ आता उभी करणे म्हणजे दलित प्रस्थापितांच्या हितसंबंधांंचे उदात्तीकरण करणे होय.

       शेवटी, प्राच्यविद्यापंडीत शरद् पाटील म्हणतात; मिथची (मिथ- पुराणकथा/ दंतकथा) गरज आजपर्यंत ज्या विद्रोह्यांना लागली, त्यांच्या हातून कळतनकळत नवी विषमताधिष्ठित शासने वा समाजच स्थापले गेले आहेत. इतिहासाच्या कळतनकळत अवैज्ञानिक आकलनातून मिथ उभ्या राहत असतात. स्वदेशाच्या इतिहासाचे वैज्ञानिक आकलन केल्याशिवाय आजच्या सम्यक समाजपरिवर्तकांना जात-वर्ग-स्रीदास्य अंत करता येणार नाही. आजचे प्रबोधन म्हणजे मिथ्सचा वास्तवाने परिहार... !

       रामायण म्हणजे प्रभू राम विरुध्द राक्षस-शूद्र रावण आणि महाभारत म्हणजे परमेश्वर कृष्णप्रणीत पांडव विरुध्द राक्षसावतार कौरव यांच्यातला संघर्ष मानून ब्राह्मणी प्रबोधन हजारो वर्षांपासून चालू आहे. "अब्राह्मणी प्रबोधन रामायणातील आंतरिक संघर्ष राम विरुध्द सीता आणि महाभारतातील आंतरिक संघर्ष पांडव विरुध्द द्रौपदी हे वास्तविक सूत्र धरून आम्ही करतो." 

     आजच्या सम्यक समाजक्रांतीचा नायक 'राम' होऊ शकत नाही, ना 'रावण'. आजच्या सम्यक समाजक्रांतीचा महानायक 'बुध्द' च होऊ शकतो...

संदर्भ:
प्राच्यविद्यापंडीत कॉ. शरद् पाटील,
१) रामायण- महाभारतातील वर्णसंघर्ष
२) पश्चिम भारतीय स्वायत्त आदिवासी राज्याची भूमिका

Popular posts from this blog

शंकराच्या मिथकाचा भौतिकवादी अन्वयार्थ काय आहे?

ट्रम्पच्या २५% भारतावरील कर आकारणीचा सर्वात जास्त धोका कोणाला आहे?