कार्ल मार्क्स का मरत नाही?

कार्ल मार्क्स का मरत नाही ?
●●●●●●●●●●●●●●●●
आजच्या दिवशी कार्ल मार्क्स मेला.  जर्मनीत जन्मला अन अखेर लंडनच्या भूमीत दफन झाला. पण जो गाडला गेला तो मार्क्सचा देह होता, त्याने मांडलेला विचार मात्र अजरामर झाला. त्याचा विचार, त्याची विश्लेषण पद्धती, त्याने विकसित केलेले समाजशास्त्र जगभरच्या लोकांनी स्वीकारले. एक लक्षात असू द्या, समाजशास्त्र काही मार्क्सने जन्माला घातले नाही तर ते आधीच जन्माला आलेले होते. मार्क्सने केवळ त्यात महत्त्वाची भर घातली अन ते आणखी विकसित केले. आता यात  मार्क्सचे काय चुकले? का तो सत्ताधारी वर्गांच्या निशाण्यावर आला? जगभरचे शोषक वर्ग का त्याला गाडायला सज्ज झाले?

काही विचारवंत असे असतात ज्यांना विरोधकांकडून प्रखर विरोध होतो. जंग जंग पछाडून त्यांना कायमचे मातीत गाडायचा प्रयत्न केला जातो.  पण फिनिक्स पक्ष्याप्रमाणे ते पुन्हा पुन्हा राखेतून झेप घेत राहतात. कार्ल मार्क्स असाच एक विचारवंत होता. खरं तर त्याला विचारवंत म्हणून स्थापित व्हायचं नव्हतं. या क्षेत्रात त्याला कोणतंही करियर करायचं नव्हतं, त्याला कुठलेही पुरस्कार मिळवायचे नव्हते की कुठे मिरवायचंही नव्हतं. गरिबीचे चटके सहन करत जगणारा, दोन वेळच्या अन्नाला मोताद होता तो. 

ठरवलं असतं तर तो वकील, प्राध्यापक, संपादक काहीही बनू शकला असता. तेव्हढं क्वालिफिकेशन होतं त्याचं. पण त्याला कामगार वर्ग खुणावत होता. औद्योगिक क्रांती नंतर उदयाला आलेल्या व्यवस्थेमुळे भौतिक प्रगती होऊ लागली पण विषमता प्रचंड वाढू लागली. नव्याने उदयाला आलेले औद्योगिक कामगार (सर्वहारा)खूप हाल अपेष्टांमध्ये जगत होते. प्रचंड दमन आणि पिळवणूक. त्याचा राग कामगार यंत्रावरच काढायचे. तोडफोड करायचे. विचारवंत अस्वस्थ होते. विषमतेवर उपाय शोधण्यासाठी वेगवेगळे विचार मांडले जात होते. कुणी म्हणत होते भांडवलदाराने अति संचय करू नये, कुणी म्हणत होते दयाळू वागा, कुणी म्हणत होते कुठे तरी लांब निर्जन बेटावर शोषणमुक्त समाज निर्मितीचा प्रयोग करता येईल, तर कुणी म्हणत होते भांडवलदाराने विश्वस्त बनून समाज व्यवस्था चालवावी. अनेक विचार, मत-मतांतरे. पण तळ कोणालाच लागत नव्हता, सगळे वर वर चाचपडत होते. 

अशा वातावरणात मार्क्स उभा राहत होता. समजून घेत होता. कामगारांच्या बाजूने विचार करत होता. त्याने समाज शास्त्रीय अभ्यास सुरू केला आणि स्वतःचे पूर्ण जीवन त्यात झोकून दिले. कामगार कष्टकऱ्यांना सुद्धा स्वतःचे तत्वज्ञान असते, समाज घडविण्याची-चालविण्याची त्यांची पण स्वतंत्र योजना असते, ते संबंध समाज व्यवस्था ताब्यात घेऊन धुरीण बनू शकतात हा शास्त्रीय सिद्धांत जगात सर्वप्रथम मार्क्सने शोधला आणि मांडला. यात अलौकिक असे काही नव्हते. मार्क्स वास्तवाला भिडला, शोधत गेला, झोकून दिले आणि त्याला सूत्र सापडत गेली. त्याने एकदा धरलेली विचारांची कास सोडली नाही, हेच त्याचे महान कर्तृत्व.

5 मे 1818 ला जन्मला अन 14 मार्च 1883 ला लंडन येथे मेला. हो मेलाच. जशी साधी कष्टकरी माणसं जगतात तसा जगला अन तसाच मेला. 

त्याच्या हयातीत त्याने पोतंभर ग्रंथ लिहिले. काही तो असतांना प्रकाशित झाले तर काही त्याच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाले. मार्क्स हा एकमेव विचारवंत आहे ज्याच्या विचारांचे विश्लेषण करणारे ट्रकभर नव्हे तर ट्रेनभर ग्रंथ गेल्या जवळपास दीडशे वर्षात लिहिले गेले आहेत. आजही लिहिले जात आहेत. त्याने जेव्हढं लिहिलं त्याच्या जवळपास शंभरपट  लिखाण त्याच्यावर जगभरच्या विविध  देशात विविध भाषांमध्ये झाले आहे. 

#कार्ल_मार्क्स_इतका_दखलपात्र_का_ठरला ? 
● कारण मार्क्सवाद हे काही मार्क्सच्या डोक्यातील खूळ नव्हे !
● बसल्या बसल्या त्याला सुचलेले 'शहाणपण' नव्हे की 
● उगाच केलेला तो काहीतरी काथ्याकूट नव्हे. 

मार्क्सपूर्व जे विचारवंत होते त्यांनी समाज विकासाचे आणि समाज बदलाचे काही नियम शोधून काढले होते. पण ते शोध पुरेसे नव्हते. जसे न्यूटन आणि आइन्स्टाइननंतर भौतिकशास्त्रीय अभ्यास थांबले नाहीत तसेच समाजशास्त्रात पण सातत्याने नवनवे शोध होत राहिले. मार्क्सपूर्व काळात सेंट सायमन, रॉबर्ट ओवेन, चार्ल्स फ्युरिए, हेगेल इत्यादी विचारवंत मानवी समाजाचा अभ्यास करतच होते. (अजून बरेच आहेत. हा तपशील मोठा आहे)

#मार्क्स असा पहिला समाजशास्त्रज्ञ आहे जो म्हणाला की मुद्दा केवळ जग समजून घेण्याचा नाही तर जग बदलण्याचा आहे !
त्याला अनेक प्रश्न पडले होते. उत्तराच्या शोधात तो वणवण फिरत राहिला. त्याने त्याच्या पूर्वी मांडले गेलेल्या सामाजिक विचारांचा अभ्यास केला आणि त्या विचारांना पुढच्या टप्प्यावर नेत त्याला आधुनिक,  मानवकेंद्री समाजशास्त्राचे रूप दिले. त्याने जे काही मांडले ते एक सोशल सायन्स आहे. 

जसे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र इत्यादी शास्त्र, तसेच हे समाजविकासाचे शास्त्र. जसे आपण भौतिकशास्त्राला न्यूटनशास्त्र म्हणत नाही, रसायन शास्त्राला अल्फ्रेड नोबेलशास्त्र म्हटले जात नाही. जशी वेगवेगळी शास्त्रे मानवी विकासाच्या क्रमात टप्याटप्याने विकसित होत आली. अनेक प्रयोग आणि यश-अपयशातून तावूनसुलाखून निघाली. जी आजही विकसित होत आहेत. तसेच मार्क्सने मांडलेले समाजविकासाचे सूत्र अंतिम नाही. त्याला पुढे नेण्याची, सातत्याने विकसित करण्याची आव्हाने मानवी समाजासमोर आहेतच.
त्यामुळे मार्क्सने जे मांडले त्या तत्वविचारांना मार्क्सवाद हे नाव पडणे अवास्तविक आणि दुर्दैवी आहे.  खरंच या समाजशास्त्राला काहीतरी वेगळे नाव असायला हवे होते. मार्क्सने मांडले म्हणजे मार्क्स त्याचा मालक होऊ शकत नाही. जसा न्यूटन किंवा आइन्स्टाइन भौतिकशास्त्राचा मालक नसतो. केवळ भाष्यकार असतो. तसाच मार्क्स सुद्धा एक भाष्यकार आहे.

त्याने जे मांडले ते खरं तर समाज विज्ञानाची पुढची पायरी आहे. पण ती अंतिम पायरी नाही. त्याला आणखी विकसित करण्याची, आपापल्या देशातील परिस्थिती आणि समाजवास्तव लक्षात घेऊन पुढे नेण्याची गरज आहे. 

मार्क्सवादाला गाडून टाकण्याचे, नेस्तनाबूत करण्याचे, कालबाह्य ठरविण्याचे काम शासक-शोषक वर्गाचे आहे, ते त्यांनी खुशाल करावे. नेटाने करावे. ती त्यांची गरज आहे. आपण का त्या दुष्प्रचाराला बळी पडायचे ?😊

आपण जनतेचे, शोषितांचे, सर्वहारांचे जर पाठीराखे असू तर आपण मार्क्सपर्यंत आणि मार्क्सनंतर  समाजशास्त्र  (Social Science) कुठपर्यंत विकसित झालंय हे समजून घेण्याचा तरी प्रयत्न करू या !

#मार्क्सवाद_हे_काही_मार्क्सच्या_डोक्यातील_खूळ_नव्हे !
मार्क्सवाद स्वीकारा अगर न स्वीकारा तो तुमचा चॉईस आहे. पण आज मानवी समाज इतक्या संकटात असतांना समोर असलेल्या बिकट प्रश्नांची उत्तरे तर शोधावी लागतील ना!

#मार्क्सने_जे_मांडले_ते_थोडक्यात_असे ...
1) द्वंद्वात्मक भौतिकवाद
(Dialectical Materialism)
2) ऐतिहासिक भौतिकवाद (Historical Materialism)
3) वरकड मूल्याचा सिद्धांत (Surplus Value)
4) वर्गसंघर्ष (Class Struggle)
5) क्रांती (Revolution)
6) सर्वहारा वर्गाचे अधिनायकत्व
(The dictatorship of the proletariat)
7) साम्यवाद (Communism)

वरील विचार आता क्रमशः बघू या...
यातलं किती काळाच्या ओघात टिकलंय आणि कोणतं प्रश्नांकित आहे ? 
याबद्दल मला असं वाटतं की...

1) #द्वंद्वात्मक_भौतिकवाद : असे तत्वज्ञान ज्याला कोणीही चॅलेंज दिलेले नाही, ते नाकारलेले नाही. याबद्दल कोणी वाद घालत नाही. त्यापूर्वीच्या भौतिकवादी तत्वज्ञानाचे ते अधिक विकसित आणि वैज्ञानिक स्वरूप आहे. ते अचानक आकाशातून किंवा कोणा बुद्धिवानाच्या डोक्यातून टपकलेले नाही. ती क्रमात विकसित झालेली मानवी समाजाची बौद्धिक मालमत्ता आहे. कार्ल मार्क्सने तिची मांडणी केली आहे. 
2) #ऐतिहासिक_भौतिकवाद : इतिहासाकडे बघण्याची अशी दृष्टी त्याबद्दल कोणाचेही दुमत असू शकत नाही. हे सुद्धा निर्विवाद आहे. या मांडणीवर नंतर अनेक गृहीतके बेतली आणि मानवी समाज बौद्धिक दृष्ट्या अधिक समृद्ध झाला. मानवी समाज आला कुठून आणि जाणार कुठे याची दिशा कळली. पाप-पुण्य, मागच्या जन्माच्या कर्माची फळे इत्यादी भंकस तत्वज्ञान या सिद्धांताने एक लाथेसह उडविले. मानवसमाज शोषणमुक्त होऊ शकतो, हा स्पष्ट विचार शोषित समुदायांना दिला आणि त्यांना पुढचा मार्ग दाखविला. 
3) #वरकडमूल्याचासिद्धांत : मार्क्सने शोधलेले भांडवली अर्थ व्यवस्थेचे असे गमक जे भांडवली अर्थतज्ञ खोडून काढू शकलेले नाहीत.  उलट भरमसाठ नफेखोरी आणि संपत्तीच्या केंद्रीकरणामुळे भांडवलशाही स्वतःचे थडगे स्वतः खणते, पुन्हा पुन्हा अरिष्टात अडकते आणि वाट शोधायला भांडवली विचारवंत मार्क्स वाचतात. 😊 (अर्थात, मार्क्सने काही या बांडगुळांसाठी ते लिहिले नाही)
4) #वर्गसंघर्ष : याबद्दल वेगवेगळी मते आहेत. जसे की भारतात केवळ वर्गसंघर्ष नसून तो जात-वर्ग संघर्ष आहे. या म्हणण्याला निश्चितच ठोस आधार आहेत. यावर सगळ्यात महत्वाचे तत्वज्ञानात्मक काम कॉ. शरद पाटील केले आहे. त्यांनी भारताच्या संदर्भात हे तत्वज्ञान पुढच्या टप्प्यावर विकसित केले आहे. यावर आणखी प्रयोगांची आणि संशोधनाची गरज आहे. मार्क्सवाद हा प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने ऍप्लाय होणार. तिथल्या तिथल्या परिस्थितीनुसार आणि गरजेनुसार. भारतीय प्रयोग खूप भिन्न असतील. त्या अनुरूप व्यवहार अजून व्हायचा आहे. डाव्या चळवळीची तशी संरचना, कार्यपद्धती, मेथड्स, अजेंडा अजून डेव्हलप व्हायचा आहे. डाव्या चळवळीच्या नेतृत्वाचे क्लास-कास्ट कॅरेक्टर हे सर्व इथल्या मातीअनुरूप व्हायचे आहे. त्याशिवाय डावी चळवळ उभारी घेऊ शकणार नाही. तो पर्यंत जे आहे ते आहे. कष्टकऱ्यांसाठी अहोरात्र काम आणि असंख्य आंदोलनांचे नेतृत्व करूनही डावे  भारतीय जनमानसाची नसनाडी काही पकडू शकलेले नाहीत, हे वास्तव आहे.
5) #क्रांती : हा प्रयोगाचा मुद्दा आहे. अनेक प्रयोग फसत,रखडत जसे भौतिक, रसायन किंवा इतर शास्त्रातील शोध लागत गेले तसे मागील अनुभवातून शहाणे होत क्रांतीचे नवनवे प्रयोग जगभर होतच राहणार. रशियन आणि चीनची क्रांती यशस्वी झाली पण आज तेथील व्यवस्था फिरून पुन्हा भांडवलशाहीच्या वाटेवर आलीय. याचा अर्थ क्रांती ही संकल्पना जगातून कायमची नामशेष झाली असे नव्हे. जो पर्यंत विषमता आणि शोषण आहे क्रांतीची निकड राहणारच. अर्थात याचे एकच एक मॉडेल नसेल. प्रत्येक देशाच्या परिस्थिती, विकासाचा टप्पा आणि वर्गीय संरचना लक्षात घेऊन प्रत्येक देशात वेगवेगळ्या पद्धतीने प्रयोग होतील. क्रांतीचे अग्रदल कोण कामगार की शेतकरी, ग्रामीण सर्वहारा की औद्योगिक मजदूर हा वादग्रस्त मुद्दा आहेच. यावर खूप मत-मतांतरे आहेत.
6)#सर्वहारावर्गाचेअधिनायकत्व: हा वादाचा मुद्दा आहे. सर्वहाराचे अधिनायकत्व याबद्दल वेगवेगळे विचार आहेत. हा न सुटलेला मुद्दा आहे. जो आजही प्रलंबित आहे. रशिया आणि चीनमध्ये सर्वहाराच्या अधिनायकत्वाच्या नावाखाली काही भलतंच घडलंय. तिथे सर्वहाराच्या अधिनायकत्वाच्या नावाखाली पक्षाचीच हुकूमशाही आली. यातील 'डेमोक्रॅटिक सेंट्रलिज्म' ही संकल्पना सुद्धा निर्विवाद नाही. त्यात बरेच व्यावहारिक घोळ आहेत. शोषणमुक्त समाजात नव्या प्रकारची लोकशाही कशी असेल यावर अजून तोडगा निघायचा आहे. मानवी समाजासमोर ते मोठे आव्हान आहे. 
7) #साम्यवाद ???
   हा प्रश्न अनुत्तरित आणि प्रलंबित आहे... मार्क्सने याबद्दल ढोबळमानाने मांडणी केली पण व्यवहारात याचे उत्तर अजून शोधायचे आहे. मानवी समाजाचा पुढचा टप्पा काय असेल? मानवी समाजाला, पुढच्या पिढयांना याचे उत्तर शोधायचे आहे. याचा कोणताही रेडिमेड फॉर्म्युला नाही. जो पर्यंत प्रयोगाच्या पातळीवर सिद्ध होत नाही, तोपर्यंत तरी तो युटिपियाच.

मानवी इच्छा आणि अपेक्षा यावर सर्व काही अवलंबून नसते. तुमच्या, माझ्या किंवा कोणा महामानवाच्या इच्छेने मानवी समाज चालत नसतो. मानवी समाजाचे स्वतःचे काही एक गतिशास्त्र असते. समाज विकासाचे काही एक नियम असतात. ते समजावून घेतल्याशिवाय आपण समाजाची दिशा बदलू शकत नाही.

अस्तित्व आधी का विचार आधी, पदार्थ आधी का जाणीव आधी? तत्वज्ञानाचा हा मूलभूत प्रश्न आहे. मार्क्सने भौतिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास केलाच त्याच बरोबर त्याने या भौतिक परिस्थितीला कसे बदलायचे याचे सूत्रही मांडले.

#थोडक्यात,
मार्क्स हा केवळ विचारवंत नव्हता तर तो तत्वज्ञ होता. कष्टकऱ्यांचा तत्वज्ञ. ज्याने कष्टकऱ्यांच्या हाती क्रांतीचे तत्वज्ञान दिले. त्याचे विचार काही  धर्मग्रंथ नव्हे. ते सातत्याने तपासले जाणारे, चिकित्सा होणारे आणि प्रयोगातून विकसित होणारे शास्त्र आहे. मार्क्सवाद हे एक सायन्स आहे हे यावरून सिद्ध होते की आपण त्याची सूत्रे व्यवहारात तपासू शकतो, आवश्यक असेल तिथे त्यात बदल वा सुधारणा करू शकतो. मार्क्सवाद स्थितीशील नाही. ते जडसूत्र नाही. कोणा महात्म्याने सांगीतलेले पवित्र वचन नाही. ते सातत्याने विकसित होणारे गतिशील समाजविज्ञान आहे. 

जशी इतर शास्त्रे विकसित होत गेली तसे सोशल सायन्सही आणखी विकसित व्हायचे आहे. मार्क्स हा त्यातील एक टप्पा होता. पण तो काही अंतिम बिंदू नव्हे.

चला एकवेळ मार्क्सला आपण नाकारू या !
पण मानवी समाज पुढे कुठे जाणार याचे उत्तर तर शोधावे लागेलच.
मार्क्सला विदेशी ठरविण्यात, बुद्धाला मार्क्सच्या विरोधात उभा करण्यात काही अर्थय का मित्रांनो! कशाला वेळ वाया घालवायचा यात. बुद्धाच्या काळात बुद्धाला जे शक्य होते ते बुद्धाने केले. मार्क्सच्या काळात मार्क्सला जे शक्य होते ते मार्क्सने केले. प्रत्येकाला स्थळ-काळाच्या मर्यादा असतातच ना. अलौकिक काही नसते. सगळी हाडामांसाचीच माणसं...

या बाबतीत नारायण सुर्वे यांनी त्यांच्या कवितेत मांडलेली जानकीअक्का मला आवडते.  तिच्यात मला माझी आई दिसते.

माझ्या आईला मी मार्क्सचा फोटो दाखवून एकदा म्हणालो, (तिच्याशी मी नेहमी हरियाणवीत बोलायचो) 'देख, यू आदमी था जर्मन देस म. इसना लिख्या विचार समाज बदलण का' आई क्षणभर त्या फोटोकडे बघत राहिली आणि म्हणाली, 'यू तो कोई फकीर सा दिखं सं. 
मी म्हणालो, 'हां, फकिरांनं ही बदल्या ह इतिहास यहां.
------------------------
#नारायण_सुर्वें_खूप_सुंदर_पद्धतीने_व्यक्त_करतात...

माझ्या पहिल्या संपातच
मार्क्‍स मला असा भेटला.
मिरवणुकीच्या मध्यभागी
माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता.
जानकी अक्का म्हणाली, ‘वळिखलंस ह्याला –
ह्यो आमचा मार्कसबाबा
जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले
आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला.
‘सन्याश्याला काय बाबा
सगळीकडची भूमी सारखीच
तुझ्यासारखी त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’

माझ्या पहिल्या संपातच
मार्क्‍स मला असा भेटला.
पुढे एका सभेत मी बोलत होतो,
– तर या मंदीचे कारण काय
दारिद्र्याचे गोत्र काय
पुन्हा मार्क्‍स पुढे आला; मी सांगतो म्हणाला,
आणि घडाघडा बोलतच गेला.
परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता.
मी म्हणालो –
‘आता इतिहासाचे नायक आपणच आहोत,
यापुढच्या सर्वच चरित्रांचेही.’
तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली
खळखळून हसत, पुढे येत;
खांद्यावर हात ठेवीत म्हणाला,
‘अरे कविता-बिविता लिहितोस की काय
छान, छान.
मलासुद्धा गटे आवडायचा.’
🌿🌿🌿🌿🌿🌿🌿

#14_मार्च_कार्ल_मार्क्स_स्मृतीदिन
#विनम्र_अभिवादन_कार्ल_मार्क्स.

Popular posts from this blog

शंकराच्या मिथकाचा भौतिकवादी अन्वयार्थ काय आहे?

Mechanic Labour Union

माहूर ची chronology (कालपट)