आईचे हृदय - माहुर
आईचे हृदय - माहुर
माहुर हे सर्वप्रथम मनुष्यवस्तीखाली आलेले अत्यंत प्राचीन ठिकाण आहे.सपाट मैदानी प्रदेश हे पुर्वीला दलदलीखाली किंवा बहुतांश जलमय असताना,त्या काळात मनुष्य वस्ती ह्या उंचावर , डोंगर माथ्यावर झालेल्या आहेत.नाशिक जिल्ह्यातील वनी येथे सप्तशृंगीने सात डोंगररांगांच्या उंचभागावर शेती करून आपला गण जगवला होता.तुळजापूरही उंचावर आहे.तेथील तुळजा घाटाच्या खाली शेती करत असे.वस्ती मात्र घाटावर होती .
आगदी त्याप्रमाणेच माहुर उंच डोंगरमाथ्यावर वसलेले सर्वात प्राचीन मनुष्यवस्तीचे ठिकाण आहे.सौंदत्तीची राज्ञी रेणुका आपल्या गणासह माहुर भागात येवून टेरेस फार्मिंग म्हणजे डोंगरावरची टप्याटप्याची शेती करुन आपला गण वाढवत होती.माहुर हा उंच डोंगर आणि त्यावर सपाट भूभाग असलेले ठिकाण आहे.खाली जवळच पैनगंगा वहाते.ही पैनगंगा याच डोंगर रांगांना धडकुन पात्र वळवून पुढे निघून गेलेली आहे.हा भाग कितीही जलमय असला तरी वर लोकजीवन सुरळीतपणे चालेल अशी नैसर्गिक व्यवस्था माहुरची आहे. माहुर हा शब्द मा उर असा बनला आहे.माउर म्हणजे आईचे हृदय.जिने आपल्याला जगवले वाढवले तिच्याप्रती उतराई म्हणून तिच्या वस्तीला माउर हे नाव तिच्या वंशजांनी दिलेले आहे.देवीचे भोपी हे मुख्य पुजारी तर गोंधळी हे प्रचारक मानले जातात. आज घडीला या देवीचे मुख्य भोपी म्हणजे पूजारी हे मराठा आहेत.
रेणू म्हणजे माती.रेणुकेच्या नावातच शेतीशी मातीशी निगडित शब्द आहे. पुढे सरकती शेती करणाऱ्या रेणुकेच्या गणाची समेट जमदाग्नीच्या गणाशी झाली. पुढे रेणुकेचा गण परशुरामाच्या रूपाने मातृसत्तेतून पितृसत्तेकडे गेला. या संदर्भात 'परशुरामाने कसे जमदागिणीचे ऐकून रेणुकेचे शीर धडा वेगळे केले ' ही कथा धर्मग्रंथात आलेलीच आहे. रेणुकेच शीर मातंग गणाने विधिपूर्वक पुरुन, दफन करून रेणुकेला आपली पूर्वजा बनवले आहे. रेणुकेला मातंगी नावाने सुद्धा ओळखले जाते. मातंग समाजामध्ये रेणुकेच्या संदर्भातल्या अनेक लोककथा आहेत. लोकगीते आहेत. याद्वारे रेणुका ही मातंग गणाची पूर्वजा होती हे निश्चित करता येते. रेणुकेच्या अनेक ठाण्यांच्या पैकी काही ठाणे आणि त्याचे पुजारीपण मातंग समाजाकडे आहे.गावगाड्यांमध्ये अनेक देव्यांची ठाणी मातंग वस्तीत आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा येथे देखील रेणूकेचे ठाणे आहे. गावापासून बाहेर असणाऱ्या डोंगरावर तिचे मंदिर आहे. नवरात्र उत्सवामध्ये मातंग स्त्रीची परडी भरल्याशिवाय पुढील विधी होत नाहीत. त्यामुळे मातंग स्त्रिया आणि रेणुका हे एक ऐतिहासिक नाते आहे.
माहुरच्या भूमीवर पुढील काळात अनेक स्थित्यंतरे झाली.अनेक राजवटीखालुन हा भूप्रदेश गेलेला आहे.व्यापाराचे, अनेक संस्कृतीचे हे केंद्र बनले होते.
याव्यतिरिक्त माहूरवर मातृतिर्थ आर्थात रेणुकेची पुष्करणी देखील आहे.शिवाय येथे अनेक एतिहासीक संदर्भ असलेले ठिकाणे , वास्तू देखील आहेत.माहूरचा किल्ला गौंड राजापांसून ते नंतर देशमुख घराण्यापर्यंत शौर्य पराक्रम गाजवत गडाचे सौंदर्य जपत होता.माहुरच्या अत्यंत पराक्रमी स्त्री असणाऱ्या रायबागण देशमुख यांच्यावर दत्ता जाधव यांची पीएचडी देखील आहे.त्यावर त्यांचे पुस्तकही आलेले आहे.
रेणुका हे लोकंदैवत आंध्रप्रदेश,तामिळनाडू,केरळ, तेलंगणा आणि महाराष्ट्र या राज्यात अत्यंत लोकप्रिय आहे.तिला यल्लमा,रेणुका, मातंगी, एकविरा, यामाई या नावाने देखील ओळखले जाते. अनेकांच्या देवघरातील टाकांच्या स्वरूपात देखील ती पूजली जाते. ग्रामीण भागात पूर्वी मुलीचे नाव रेणुका हे प्रत्येक गावामध्ये ठेवले जायचे.मलप्रभा, तुंगभद्रा, पैंनगंगा या नद्यांच्या किनाऱ्यावर रेणुकेने आपला गण वाढवला होता.
रेणुकेच्या संदर्भातल्या सर्व लोककथा, लोकगीते, तिच्या नावाने असलेली गावांची नावे, ठाणे आदींचा अभ्यास केल्यास आपल्याला आणखी मोठा इतिहास हाती लागतो.
नितीन सावंत परभणी
9970744142