ऐ भगतसिंग तू जिंदा हैं

भगतसिंगाने आयुष्यात एकदाच पिस्तूल झाडले आणि एकदा अहिंसक आवाजी बॉम्ब टाकला.

मुद्दा खरा भगतसिंह जाणून घेण्याचा आहे !!
भगतसिंहाचे सहकारी कॉ. शिव वर्मा यांनी 'संस्मृतियाँ' मध्ये आणि पुण्यात १९८५ मध्ये सांगितलेली आठवण. भगतसिंहाच्या  "... लांब ढगळ सदऱ्याच्या एका खिशात पिस्तूल आणि दुसऱ्या खिशात पुस्तक असे" आणि " सुनसान रस्त्यावरून चालतानाही तो पुस्तक वाचत असे". 

भगतसिंहाचे दुसरे सहकारी जितेंद्रनाथ सन्याल यांनी  "त्यावेळी देशात हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या ज्या अभ्यासू राजकीय व्यक्ती होत्या त्यापैकी एक" असे त्याचे वर्णन केले आहे. तर "लाहोरच्या तुरुंगाचे रूपांतर त्याने विश्वविद्यालयात केले होते" असेही म्हटले गेले आहे.

इयत्ता 4 थीमध्ये असताना भगतसिंहाने सरदार अजितसिंह (त्याचे काका आणि पंजाब प्रांतातील जहाल नेते), लाला लजपतराय व अन्य नेते यांच्या तसेच राष्ट्रीय राजकीय घडामोडींबाबतच्या कात्रणांच्या अनेक फाइल्स वाचून काढल्या होत्या. एवढेच नव्हे तर सरदार अजितसिंह, सूफी अंबा प्रसाद आणि लाला हरदयाल यांनी लिहिलेल्या व अन्य अशा सामाजिक-राजकीय विषयांवरील किमान 50 पुस्तिका /पुस्तकांचे वाचन त्याने इयत्ता चौथीपर्यंत केलेले होते. [लाला हरदयाल हे  'गदर' पक्षाचे एक संस्थापक त्यांनी कार्ल मार्क्सवर भारतात पहिला सविस्तर लेख ( 'कार्ल मार्क्स : ए मॉडर्न ऋषी' ) मॉडर्न रिव्ह्यूमध्ये मार्च 1912 मध्ये लिहिला होता.]     
                                                                                                                                      मध्यंतरीच्या काळात त्याने केलेला अभ्यास ही एक आवर्जून उल्लेख करण्यासारखी गोष्ट आहे. लाहोरच्या द्वारकादास लायब्ररीपासून त्याने सतत जे वाचन केले, त्यात  मार्क्स, एंगल्स, कौटस्की, लेनिन, बुखारीन, ट्रॉटस्की यासारख्या 'मार्क्सवादी' विचारवंतांचे ग्रंथ असत, अशी त्या ग्रंथपालांची आठवण नोंदलेली आहे. 

त्याच्या 'तुरुंग नोंदवही'त एकूण 107 विचारवंत-ग्रंथकारांची अवतरणे / उद्धृते आढळतात. त्यात बर्ट्रांड रसेल, जे. एस. मिल, रोबेस्पिअर, जॉर्ज बर्नार्ड शॉ, गॉर्की, उमर खय्याम, वर्डस्वर्थ, सॉक्रेटीस, ऍरिस्टॉटल, दिदेरो, रुसो, प्लेटो, ऑस्कर वाईल्ड, व्हिक्टर ह्यूगो, रवींद्रनाथ टागोर, अप्टॉन सिंक्लेअर, टॉम पेन, थॉमस जेफरसन, युजीन डेब्स, हॉब्स, लॉक, बुकॅनन, दोस्तोव्हस्की, स्पिनोझा, बेकन, देकार्त, इब्सन,व्हीटमन, चिरोल, टेनिसन, म. गांधी, कार्लाईल,जॅक लंडन, इमर्सन, लो.टिळक, वेरा फिग्नर, हर्बर्ट स्पेन्सर अशी नावे दिसतात.                                                                                         

या काळात त्याने अर्थकारण, न्याय आणि विधिशास्त्र, राज्यसंस्था आणि राजकारण, नागरिकशास्त्र आणि लोकशाही, धर्म, तत्वज्ञान, साहित्य, इतिहास, विचारसरणी आणि समाजव्यवस्था यांचा अभ्यास केला. चित्रपट, कथा-कादंबऱ्या, कविता-गाणी-शेरोशायरी यावर तर त्याचे नितांत प्रेम होते.

एकदा जेलरने त्याला कुचेष्टेने विचारले "इतकी पुस्तके तू बाहेरून मागवतोस, ती वाचतोस की अशीच उगीच मागवतोस?" जेलमध्ये आल्या-गेल्या सर्व पुस्तकांची नोंद असतेच. त्याचा उल्लेख करून भगतसिंह म्हणाला "त्यातील कोणतेही पुस्तक मागवा, त्यातील कोणत्याही प्रकरणाचे नाव मला सांगा, मी तुम्हाला त्यातील मुख्य अर्ग्युमेण्ट सांगतो!"

फाशीचा दिवस जवळ आलेला असताना वकील प्राणनाथ मेहतांनी काय आणू म्हणून विचारले. भगतसिंहाने एक पुस्तक मागवले. फाशीची वेळ झाली तेव्हा वार्डन बोलवायला आला. भगतसिंह म्हणाला " ठहरो, एक क्रांतिकारी की दुसरे क्रांतीकारी से साथ मुलाकात हो रही है". तो रशियन क्रांतीचा नेता लेनिनचे चरित्र वाचत होता!!
युवकांनी वाचन व चिकित्सक विचार केला पाहिजे हे तर तो वेळोवेळी सांगतोच, पण तो म्हणतो : 

"...भारतीय क्रांतीचे बौद्धिक अंग हे नेहमीच कमकुवत राहिले आहे, त्यामुळे क्रांतीसाठीच्या अत्यावश्यक गोष्टी आणि पार पाडलेल्या कार्याचा प्रभाव याकडे लक्ष दिले गेलेले नाही. यासाठीच क्रांतिकारकाने अभ्यास व चिंतन-मनन ही आपली पवित्र जबाबदारी मानली पाहिजे."

#शहीदभगतसिंग #23March

Popular posts from this blog

शंकराच्या मिथकाचा भौतिकवादी अन्वयार्थ काय आहे?

Mechanic Labour Union

माहूर ची chronology (कालपट)